
वाळूजमहानगर, (ता.22) – दोन दिवसापूर्वी एका विद्यार्थिनी आत्महत्या केल्यानंतर बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीच्या दोन संचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या प्रकरणी दुसरा गुन्हा गरुड झेप अकॅडमीच्या दोन संचालकांसह चार जणांवर दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आडगाव बुद्रुक ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत दशरथ वाघ (18) हा 22 नोव्हेंबर 2022 पासुन बजाजनगर येथील गरुडझेप अकॅडमीत पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेवुन तेथे प्रशिक्षण घेत होता. या प्रशिक्षणासाठी वन टाईम फिस 95 हजार रुपये संस्था चालकांनी घेतले होते. व खानावळीचे दरमहा 4 हजार 500 रुपये असे ते नियमीत भरीत होते. सुरुवातीला श्रीकांत वाघ याला 5 ते 6 महिने चांगली वागणुक देवुन नंतर खानावळीचे पैसे भरण्याला उशीर होतो. या कारणास्तव तेथील व्यवस्थापक विजय राठोड व शुभम घुगे यांनी शारिरीक व मानसिक त्रास दिला. त्याची तक्रार श्रीकांत याने निलेश सोनवणे व सुरेश सोनवणे यांच्याकडे केली म्हणुन निलेश सोनवणे व सुरेश सोनवणेच्या सांगण्यावरून राठोड व शुभम घुगे यांनी पट्टयाने मारहाण करुन, अंधा-या रुम मध्ये कोंडुन, त्यास टार्गेट करुन त्याचा सार्वजनिक अपमान करुन आत्महत्येस प्रवृत्त केले. म्हणुन त्याने गरुड झेप अकॅडमी मध्येच 28 डिसेंबर 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल आहे. पुढील तपासात गुरुवारी (ता.22) रोजी मयताचे आई वडील हे घटना घडल्यापासुन मानसिक तणावात व सतत आजारी असत. गरुडझेप अकॅडमीमध्येच काल झालेल्या आणखी एका आत्महत्येची बातमी वाचुन त्यांना धक्काच बसला. यामुळे त्यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी दशरथ शेषराव वाघ (45) रा. आडगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी गरुड झेप अकॅडमी चे संचालक निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, व्यवस्थापक विजय राठोड व शुभम भुंगे अशा चार जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करत आहे.
