
वाळुज महानगर, (ता 21) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपूंजी) येथील अवैध धंदे, खुलेआम दारूविक्री, उघड्यावर होणारी मांसविक्री, बेशिस्त वाहतूक, ढासाळलेली आरोग्य यंत्रणा, वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आदी विविध सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत रांजणगाव (शेणपुंजी) च्या वतीने आज सोमवारी 22 डिसेंबरपासून बेमुदत रांजणगाव बंद पुकारण्यात आला आहे. या बेमुदत बंदला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे, तहसीलदार गंगापूर, आरोग्य विभाग यांना रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतच्या वतीने दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथे विविध कारखान्यांसह कामगार, व्यापार वाढला. तशी गुन्हेगारी वृत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कामगार, बेरोजगार, नागरिक व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन येथे विविध प्रकारचे अवैध धंदे असून ते खुलेआम सुरू आहे. यामध्ये खुलेआम दारूविक्री, उघड्यावरील मांसविक्री, बेशिस्त वाहतूक व ढासळलेली आरोग्य यंत्रणा आदीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रांजणगाव येथे खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे व दारु विक्रीमुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. परिणामी यातून गुन्हेगारीला वाव मिळत असून, दररोज किरकोळ अथवा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत.
उघड्यावर मांसविक्री –
येथे जागोजागी उघड्यावर मांसविक्रीची दुकाने थाटली आहे. त्यामुळे रस्त्यावरच ग्राहकांची गर्दी होते. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी करण्यात येते. यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागतात. अनेकदा तुतु मैमै होऊन प्रकरण हातापायीवर येते. यावेळी झालेल्या भांडणाचे रुपांतर वाढत्या गुन्हेगारीत होते.
बेशिस्त वाहतूक –
प्रवाशांच्या तुलनेत रांजणगाव येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. रस्त्यावरील प्रवासी मिळवण्यासाठी वाहनधारक अचानक ब्रेक लावून थांबवितात. रस्त्यातच वेडीवाकडी वाहने उभी करतात. यामुळे रांजणगाव येथे बेशिस्त वाहतूकीचे चित्र पहावयास मिळते. त्यातून दररोज लहान-मोठे अपघात होतात. अनेकांचा जीव सुद्धा जातो. कित्येकांना अपंगत्व येते,
तोडकी आरोग्य यंत्रणा –
वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी, वाद विवाद, भांडणतंटा यामुळे होणारे तसेच लहान मोठ्या अपघातामुळे होणारे जखमी. तसेच दुर्गंधीमुळे रांजणगाव येथील रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत येथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.
दररोजच तक्रारीचा पाऊस –
रांजणगाव शेणपुंजी येथे अवैध धंदे, खुलेआम दारूविक्री, मांसविक्री, वाढती गुन्हेगारी, होणारे वाद विवाद व गुन्हेगारीमुळे ग्रामपंचायत कार्यालयात दररोजच तक्रारीचा पाऊस पडतो. ग्रामपंचायत च्या दैनंदिन कामापेक्षा नागरिकांच्या आशा अवांतर कामातच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचा वेळ जातो. त्यामुळे येथील वाढत्या घटना व गुन्हेगारी लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा व्यवस्थापनेला लेखी निवेदन देत सोमवारी 22 डिसेंबर पासून रांजणगाव (शेणपुंजी) संपूर्ण गाव बंद पुकारण्यात आला आहे.
विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबा –
ग्रामपंचायतच्या वतीने पुकारलेल्या या गावबंद आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी विविध राजकीय पक्षांसह श्री संत सावता माळी – हनुमान मंदिर ट्रस्ट व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
