March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.25) – मालट्रकचे इंजिन व चेसीस याचे मुळ क्रमांक खोडुन, बनावट क्रमांक टाकुन त्यांची वारंवार विक्री करणारी व फायनान्स कंपन्यांना चकमा देवुन एकाच ट्रकवर पुन्हा पुन्हा कर्ज उचलुन हेराफेरी करणाऱ्या टोळीचा वाळूज पोलिसांनी मंगळवारी (ता.25) रोजी पर्दाफास केला. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 1 कोटी रुपये किमतीच्या 4 मालट्रक जप्त करण्यात आल्या.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज ठाण्याचे पोलीस अंमलदार विजय पिंपळे यांना मिळालेल्या माहीती नुसार विशेष पथकाचे पोउपनि – अजय शितोळे, पोअ. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ यांनी वाळुज पोलीस ठाण्या समोरुन जाणारा टाटा ट्रक ( एम एच 40, सिटी -1289) हा 10 मार्च रोजी थांबविला. या ट्रकची तपासणी केली असता त्याचे इंजिन व चेसिस नंबर बनावट असल्याचे निष्पण झाले. त्यामुळे वाळूज पोलीस ठाण्यात कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340 (2) भारतीय न्याय संहीता – 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच जण लागले गळाला
या गुन्ह्याच्या तपासात ट्रकचा मालक कौसर पठाण याच्यासह टोळीचा प्रमुख पुंजाराम मनाळ यास अटक करण्यात आली. त्याच्याकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे आणखी तीन मालट्रक जप्त करुन त्यांचे मालक व चालक आनंद कृष्णा आक्कर रा.सिडको वाळुज महानगर, छत्रपती संभाजीनगर, दादाराव साहेबराव बरडे रा.म्हसोबा गल्ली, सिल्लोड, गणेश आकुशराव डाके रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर. असे पाच जण गळाला लागले असून त्यांना अटक करण्यात आली.

            अशी करत होते मालट्रकची हेराफेरी –
अटक केलेल्या पाचही आरोपींना 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे आरोपी ट्रकवरील कर्ज न भरता त्यांचे इंजिन व चेसिस नंबर बदलुन मालट्रकची रंगरंगोटी करुन पुन्हा नव्याने कर्ज प्रकरण करुन त्यांची नोंदणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात आणखी तथ्य समोर येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी वर्तविली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अजय शितोळे हे करीत आहे.

यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पोअं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, पोलीस मित्र अमन शेख यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *