March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन कंपनीला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या सहा कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीचा मालक व ठेकेदारच्या विरुद्ध गुन्हा दाखल व अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना शुक्रवार (ता.5) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावण्यात आले.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छञपती संभाजीनगर येथील बायजीपूरा, गल्ली नं. 10, मध्ये राहणाऱ्या साबेरखान शब्बीरखान पठाण याने वाळुज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये नियमाची पायमल्ली करून अतिरिक्त बांधकाम केले. तेथे सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन सुरू केले.

या कंपनीत ज्वलनशील प्लास्टिक व कॉटनचे हातमोजे साठा करून सुरक्षेची कोणती काळजी न घेता, आग लागल्यास उपाय योजनाचे कोणतेही साहित्य न बाळगता कामगारांच्या जीवाची काळजी घेतली नाही. तसेच कंपनीत राहण्याची परवानगी नसतानासुद्धा तेथे राहण्याची व्यवस्था केली. तसेच कंपनीचा ठेकेदार मोहम्मद हिसनोमुद्दीन शेख, रा. डलौखर, तालुका मिर्झापूर जिल्हा मधुबनी, (बिहार राज्य)याने जास्त पैशाच्या मोहापाई कामगारांच्या जीवाला धोका असल्याचे माहित असून सुद्धा त्यांना कंपनीत राहण्यास भाग पाडले. रविवारी (ता.31) रोजी लागलेल्या आगीच्या तांडवात सहा कामगारांचा मृत्यू झाला.

या कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सरकारच्या वतीने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांच्या फिर्यादीवरून सनशाइन इंटरप्राईजेस कंपनीचा मालक साबेरखान शब्बीरखान पठाण व ठेकेदार मोहम्मद हिसनोमुद्दीन शेख या दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि. 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून पोलिसांनी सोमवारी (ता.1) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शुक्रवार (ता.5) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *